पुत्र डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे दिग्गज नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार्या जाहीर सभेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काही आमदारही भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे.
राधाकृष्ण विखे पाटील राज्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे नगर जिल्ह्यात भाजपला बळ मिळेल तर काँग्रेसला याचा फटका बसेल, असे बोलले जाते. अहमदनगर (दक्षिण) ची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे डॉ.सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी २३ मेनंतर भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची भूमिका आहे. मात्र, २३ मेनंतर पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता असल्यामुळे ते आधीच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर, अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.